अहमदनगर मधील वादग्रस्त प्राध्यापक भरतीतील गोंधळ वाढला
या सर्व प्रकरणात संस्था, विद्यापीठ प्रशासन आणि उच्च शिक्षण विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमधील (Ahmadnagar District Maratha Vidya Prasarak Samaj) प्राध्यापक भरतीसाठी (professor recruitment) मुलाखतीची प्रक्रिया पार पडून सुमारे दोन महिने होत आले आहेत. तरीही मुलाखतीतून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करायची की नव्याने भरती प्रक्रिया राबवायची याबाबत अद्याप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक वाक्यता झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न या संस्थेतील भरती प्रक्रियेमधील गोंधळ अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुमारे दोन महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यातील नोकर भरती प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्यानीच केला. तसेच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्यात आला. परिणामी त्यांनी अध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. परंतु, या सर्व प्रकरणात संस्था, विद्यापीठ प्रशासन आणि उच्च शिक्षण विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेने प्राध्यापक भरती / निवड प्रक्रिया रद्द करून नवीन समिती मिळण्यासंदर्भात विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावर महाविद्यालयाचे व्यवस्थापन हे त्या महाविद्यालयातील कर्मचारी वर्गाचे नियुक्ती व शिस्तविषयक प्राधिकरण आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया / निवड प्रक्रिया राबवणे / रद्द करणे ही व्यवस्थापनाच्या अखत्यारीतील बाब आहे, असे उत्तर विद्यापीठ प्रशासनातर्फे संस्थेला देण्यात आले आहे.
या सर्व घटनाक्रमानंतर संस्था राबवलेली भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवणार की विद्यापीठाच्या निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांना संस्थेकडून नियुक्ती पत्र दिले जाणार , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.परंतु, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांच्यात अद्याप याविषयी कोणतीही एक वाक्यता झाली नसल्याचे समोर आले आहे. परिणामी भरती प्रक्रियेतील गोंधळ यापुढे वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
-------------------
" संस्थेतील प्राध्यापक भरती संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पत्र प्राप्त झाले आहे. परंतु, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल."
- रामचंद्र दरे, प्रभारी अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज
-------------------
"अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील प्राध्यापक भरती संदर्भात पुणे विद्यापीठाने केलेल्या पत्रव्यवहार अद्याप माझ्यापर्यंत पोहोचला नाही. परंतु, राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतून निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यायचे किंवा नाही.तसेच भरती प्रक्रिया पुन्हा घ्यायची किंवा नाही यासंदर्भातील निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीतच घेतला जाईल."
-जी.डी.खानदेशे, सचिव , अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज