अभिजात भाषेच्या दर्जाचा उपयोग काय ? ; कॉलेजच विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊ देईना; विद्यापीठाकडे लेखी तक्रार
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकायला मिळावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे.कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बळजबरीने हिंदी विषय घेण्यास भाग पाडले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा (Classical language status) देण्यात आल्याने त्याचा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील(College affiliated to Savitribai Phule Pune University) विद्यार्थ्यांना मराठी विषय (Marathi subject)घेण्यापासून रोखले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्थेच्या (Kasturi Institute of Education)कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी नुकतीच याबाबत विद्यापीठाकडे लेखी तक्रार (Complaint in writing to the University)केली आहे.त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही जर विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे शिक्षण घेता येत नसेल तर या सारखे दुसरे दूर्दैव नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेच्या विकासाठी आणि उत्कर्षासाठी झाली.त्यामुळे विद्यापीठाने नेहमीच मराठी भाषेचा पुरस्कार केला.मात्र,त्याच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकायला मिळावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे.कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बळजबरीने हिंदी विषय घेण्यास भाग पाडले आहे.सध्या महाविद्यालयात हिंदी विषय शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत.एवढेच नाही तर विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जात मराठी विषय जनरल आणि एमआयएल हे विषय लिहिल्यानंतर संबंधित अर्ज स्वीकारला जात नाही.हिंदी विषय नको असताना विद्यार्थ्यांना घेण्यास दबाव आणला जात आहे.विद्यार्थ्यांना मातृभाषेचे शिक्षण घेऊ दिले जात नसल्याने विद्यार्थी हताश झाले आहेत.विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे.
नवीन महाविद्यालय मंजूरीची प्रक्रिया आता विधानसभा निवडणूकीनंतर ?
कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने यापूर्वीही एकदा विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षणयापासून रोखले होते.त्यावेळीही काही विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली होती.मात्र,त्यानंतरही महाविद्यालय प्रशासनाच्या कारभारात सुधारणा झाली नाही.परंतु, चालू शैक्षणिक वर्षांपासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे.विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय घेण्याची मोकळीक आहे.मात्र महाराष्ट्रात राहून विद्यार्थ्यांना मराठी विषय घेण्यापासून रोखले जात आहे.परंतु, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तरी या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा मराठी विषय शिकायला उपलब्ध होऊ शकेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच संस्थेचा आणि महाविद्यालयात मराठी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापिका यांचा वाद असल्याने विद्यार्थी त्यात भरडले जात आहेत,असेही बोलले जात आहे.
दरम्यान, या विषयी संबंधिकत महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता मी दोन दिवसांपूर्वीच काम पाहण्यास सुरूवात केली आहे.मला याबाबत कल्पना नाही,असे त्यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले.
--------------------------------------
कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांची लेखी तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली असून विद्यापीठातर्फे या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल.
- डॉ.विजय खरे, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ