तीन वर्षांत TET उत्तीर्ण न झाल्यास सेवा समाप्त ; नवीन शासन निर्णय प्रसिद्ध..
राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) किंवा TET अनिवार्य केली. २० जानेवारी २०१६ च्या निर्णयानुसार अनुकंपा शिक्षण सेवकांना यामध्ये सूट देण्याचा निर्णय एनसीटीईच्या धोरणाशी विसंगत असल्याने या शिक्षकांनाही टीईटी कक्षेत आणले गेले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नवीन प्रकाशित झालेल्या शासन निर्णयानुसार (Government decision) आता राज्यात अनुकंपा तत्त्वावरील प्राथमिक शिक्षक (Compassionate Primary Teacher) नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे या शिक्षकांनी तीन वर्षांत ही पात्रता परीक्षा पास न केल्यास त्यांची सेवा आता समाप्त करण्यात येणार, असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) २३ ऑगस्ट २०१० च्या अधिसूचनेद्वारे पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करत शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली होती. त्यानुसार राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ आणि ६ मार्च २०१३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) किंवा TET अनिवार्य केली. २० जानेवारी २०१६ च्या निर्णयानुसार अनुकंपा शिक्षण सेवकांना यामध्ये सूट देण्याचा निर्णय एनसीटीईच्या धोरणाशी विसंगत असल्याने या शिक्षकांनाही टीईटी कक्षेत आणले गेले आहे.
२०१६ च्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळालेले, वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी मिळालेले शिक्षक, तसेच अनुकंपा तत्त्वावर संस्थांनी नियुक्ती दिलेल्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षांची मुदत दिली आहे. मात्र, त्यांची अनुकंपावरील नियुक्त्ती असल्याने इतर पदावर सामावून घेण्याची कार्यवाही प्राधिकाऱ्यांनी करावी. यावेळी सेवाज्येष्ठता अंतिम क्रमांकावर राहील, असेही म्हटले आहे.