उद्योगांसाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. योजनेची सविस्तर माहिती www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

उद्योगांसाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण (Technical training) देणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम (IGTR) (छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारत सरकारच्या प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे या संस्थेने सामंजस्य करार (Memorandum of Understanding) केला आहे. याद्वारे उद्योगांसाठीचे तांत्रिक  प्रशिक्षण घेणार्‍या उमेदवारांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी (Vijay Joshi) यांनी केले आहे. योजनेची सविस्तर माहिती www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अमृत संस्थेच्या प्रशिक्षित गटातील उमेदवारांना उत्कृष्ट दर्जाचे निवासी आणि अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, राहणे व भोजन) अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. कोणताही शासकिय विभाग, संस्था, महामंडळ यांच्या योजनेचा लाभ मिळत नसलेल्या राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकतील १८ ते ४० वयोगटातील पात्रताधारक युवक-युवती  या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

या योजनेअंतर्गत १५ निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच ३० अनिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम हे आय.जी.टी.आर. (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर, वाळूज, पुणे, नागपूर, कोल्हापूर या उपकेंद्रात दिले जातील. १० वी उत्तीर्ण तसेच आय.टी.आय.,पदविका, पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे अनिवार्य आहे.