आदिवासी समाजातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
टार्गेट पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आदिवासी समाजातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच विशेष शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. डहाणू येथील के. जे. सोमय्या माध्यमिक विद्यालय, नरेशवाडी या शाळेच्या आवारात ही कार्यशाळा पार पडली. एकूण ९४ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला,
भांडुप येथील रवी धर्मा यांनी या कार्यशाळेचे नेतृत्व केले. रवी धर्मा हे अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी एसएससी बोर्डाचे नियामक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी या कार्यशाळेमध्ये एसएससी परीक्षेची पूर्वतयारी, वेळेचे नियोजन, तणावाचे व्यवस्थापन, उत्तरे लक्षात ठेवण्याची प्रभावी तंत्रे, नियोजनबद्ध उत्तरांची मांडणी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागून ते परीक्षेसाठी सुसज्ज झाले. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सत्रात विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषादेखील घेण्यात आली.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संसाधने उपलब्ध व्हावीत, या हेतूने टार्गेट पब्लिकेशन्सद्वारे बोर्ड परीक्षेसाठीच्या पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.
रवी धर्मा म्हणाले की, 'कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांचे उत्साही चेहरे पाहणे खूप समाधानकारक होते. त्यांच्यात कमालीची ऊर्जा दिसून आली. या उर्जेला यशाच्या दिशेने झेप घेण्यासाठी योग्य संसाधनांचा पुरवठा करणे किती आवश्यक आहे. हे पुन्हा अधोरेखित झाले. प्रश्नोत्तरांच्या सत्रादरम्यान त्यांच्या उत्साहाचे साक्षीदार होणे खरंच एक आनंददायी क्षण होता. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी तयार करणे हे आमचे उद्दिष्ट नसून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी करणे यासाठी आमचा प्रयत्न होता. या कार्यशाळेत परीक्षेचे नियम्, वक्तशीरपणा, आणि कमाल गुण मिळवण्यासाठी अधिकाधिक प्रश्न सोडवणे यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या. या कार्यशाळेमुळे परीक्षेचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यासाठी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वृद्धिंगत झाला.
के. जे. सोमैय्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज वनमाळी म्हणाले, या कार्यशाळेच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढीस लागला आहे. टार्गेट पब्लिकेशन्सच्या मोफत पुस्तक वाटपामुळे आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी तयारीच्या दृष्टीने मोठा आधार मिळाला. टार्गेट पब्लिकेशन्सचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
टार्गेट पब्लिकेशन्सचे कार्यकारी संचालक तुषार चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेचा सर्वसमावेशक दृष्टिकोन ठळकपणे मांडला. ते म्हणाले, 'प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विकास व्हावा यासाठी टार्गेट पब्लिकेशन्स सतत प्रयत्नशील आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे आणि विद्यार्थ्यांच्या यशात आम्ही योगदान देऊ शकतो, याचा आम्हाला अभिमान आहे.