स्टार्ट अप्समध्ये राज्याचा डंका; देशांतील नऊ राज्यांमधील १२ विजेत्यांपैकी चार महाराष्ट्रातील
देशभरातील २८ राज्यांमधून एकूण ३७८ अर्ज प्राप्त झाले होते. बारा स्टार्ट-अप्स विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील ४ स्टार्ट-अप्सचा समावेश आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
युथ को:लॅब (Youth Co:Lab) नॅशनल इनोव्हेशन डायलॉग २०२२ मध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) चार स्टार्ट अप्स (StartUps) विजयी झाले आहेत. देशातील नऊ राज्यांमधील एकूण १२ स्टार्ट अप्स विजेत्यांमध्ये महाराष्ट्राने आपला ठसा उमटवला आहे. विजेत्या १२ स्टार्ट-अप्स संस्थांना त्यांच्या नवकल्पना वाढवण्यासाठी पाच हजार डॉलर पर्यंत सीड फंडिंग प्राप्त होणार आहे. (StartUps in Maharashtra)
युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग इंडियाच्या पाचव्या आवृत्तीत सहा संकल्पना होत्या. त्यामध्ये कृषी, शिक्षण-तंत्रज्ञान, महिलांसाठी उपजीविका, चक्राकार अर्थव्यवस्था आणि जैवविविधता या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील ९ राज्यांमधील बारा अव्वल स्टार्ट-अप्सना विजेते म्हणून घोषित करण्यात आले. अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) चे अभियान संचालक डॉ. चिंतन वैष्णव, यूएनडीपी इंडियाच्या निवासी प्रतिनिधी शोको नोडा आणि अभिनेत्री आणि यूएनडीपी चॅम्पियन संजना संघी यांनी विजेत्यांना सन्मानित केले.
MBA Admission : सीईटी सेलकडून प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ७ जुलैपर्यंत भरा अर्ज
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि सिटी फाउंडेशन द्वारा २०१७ मध्ये संयुक्तपणे निर्मित यूथ को:लॅबचा उद्देश युवकांना सशक्त बनवणे आणि त्यांच्यात गुंतवणूक करण्याच्या उद्दिष्टाने, आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी एक सामायिक अजेंडा तयार करणे असून, ज्यामुळे नेतृत्व, सामाजिक नवोन्मेष आणि उद्योजकता याद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीला गती येऊ शकेल.
देशभरातील २८ राज्यांमधून एकूण ३७८ अर्ज प्राप्त झाले होते. बारा स्टार्ट-अप्स विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील ४ स्टार्ट-अप्सचा समावेश आहे. यामध्ये दिव्यांगांसाठी संधी निर्माण करणारे पुण्यातील संस्थापक आकाशदीप बन्सल यांचे सरल एक्स (SaralX), महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणारा मुंबईतील संस्थापक सौम्या डबरीवाल यांचा प्रोजेक्ट बाला (Project Baala), महाराष्ट्रात महिला शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण संबंधी उपाय सुचवणारा संस्थापक अक्षय दीपक कावळे यांचा ऍग्रोशुअर (Agrosure) आणि कमी कार्बनच्या शाश्वत पर्यायांवर खर्च करण्यास प्रोत्साहन देणारा संस्थापक रजत सोहन विश्वकर्मा यांचा मुंबईतील मायप्लॅन ८ (Myplan 8) यांचा समावेश आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.