कंत्राटी शिक्षक भरतीला पुन्हा सुरूवात; प्रति महिना १५ हजार रुपये मानधन
दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांत या निवड झालेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या होतील. यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने १० डिसेंबरपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
डीएड, बीएड पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने DEd व BEd पात्रताधारक (DEd and BEd qualification holders)उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर शिक्षक भरती (Contract teacher recruitment) करण्यात येणार आहे. आचारसंहितेमुळे बंद पडलेली भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे शिक्षक होण्याची स्वप्न पाहाणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी प्राप्त झाली आहे. दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांत या निवड झालेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या होतील. यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने (Sangli Zilla Parishad Primary Education Department) १० डिसेंबरपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खुल्या वर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत ग्राह्य धरली जाईल. ज्या शाळेत नियुक्ती होणार असेल, तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहणार आहे. त्यानंतर, तालुका व जिल्हा या अनुक्रमाने प्राधान्य दिले जाणार आहे. ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. त्यामध्ये मुदतवाढीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल. नियुक्त उमेदवारांना प्रति महिना १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या पदावर कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त होणार आहे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने मागील काही दिवसात सदर रिक्त पदावर जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना शिकवण्यासाठी आवेदन पत्र मागवले होते. मात्र, ही बाब उचित नसल्याने बारावीनंतर डीएड आणि बीएड व पदव्युत्तर शिक्षण घेऊन अनेक बेरोजगार युवक, युवती हे जिल्ह्यात बेरोजगार आहेत. त्यामुळे रिक्त पदावर सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्याचा जो आदेश काढलेला आहे तो आदेश बदलवून जिल्ह्यातील डीएड, बीएड, पदव्युत्तर सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींची प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत कंत्राटी शिक्षक या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे.
__________________________________
या भरती प्रक्रियेमुळे डीएड, बीएड बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यात १३६ जिल्हा प्राथमिक शाळा आहेत. जिथे नवीन कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये कुठेही मानवी हस्तक्षेप होणार नाही, उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असून ज्या ठिकाणी गावातील एकपेक्षा अधिक उमेदवार असतील, अशावेळी उच्च शिक्षित उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी, (प्राथमिक) सांगली जिल्हा परिषद