YCMU : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ
यापूर्वी देण्यात आलेली मुदतवाढ ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आल्याने आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ (Extension of time for admission) देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. नव्या मुदत वाढीनुसार आता उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत (Extension till 15 September) ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध असणार आहे. यापूर्वी देण्यात आलेली मुदतवाढ ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आल्याने आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुक्त विद्यापीठामार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी १ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ३१ जुलैपर्यंत या प्रवेशांसाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर आता १५ सप्टेंबरपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली.
यामुळे आणखी १५ दिवसांची वाढ केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना विनाविलंब शुल्क भरून प्रवेश घेता येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी दिली. संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांनी प्राप्त करून घ्यावी. त्यामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे निर्धारित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करावा, असे कळवण्यात आले आहे. प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास विद्यापीठाच्या सहाय्यता क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.