मराठी भाषेतील शिक्षणाचे कारण देत, बेळगाव पालिकेने कामगारांची निवड रोखली..
मराठी माध्यमात शिक्षण घेतल्याचे कारण देत काही अर्जदारांना डावलण्यात आल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. शिवाय बारा वर्षे कंत्राटी तत्त्वावर सफाई कामगार म्हणून सेवा बजावणाऱ्या सफाई कामगारांची नावेही यादीतून वगळण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बेळगाव महापालिकेने (Belgaum Municipal Corporation Recruitment) नुकतीस सफाई कामगार भरती प्रक्रियेत (Sanitation Worker Recruitment Process) पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध (Selection list released) केली आहे. त्यामध्ये मराठी माध्यमात शिक्षण घेतल्याचे कारण देत काही अर्जदारांना डावलण्यात आल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. शिवाय बारा वर्षे कंत्राटी तत्त्वावर सफाई कामगार म्हणून सेवा बजावणाऱ्या सफाई कामगारांची नावेही यादीतून वगळण्यात आली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बेळगाव पालिका प्रशासनाच्या (Belgaum Municipal Administration) विरोधात मराठी उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत.
बेळगाव महापालिकेत शंभर सफाई कामगारांची भरती केली जाणार आहे. त्यानुसार ९४ जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित सहा जागा या दिव्यांगांसाठी राखीव सोडण्यात आल्या आहेत. परंतू, या वर्गातील पात्र उमेदवार न मिळाल्याने सहा जागा रिक्त राहिल्याची माहिती मिळाली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निवड यादीवर आक्षेप मागविण्यात आले आहेत. त्यानंतर आता मोठ्या संख्येने आक्षेप दाखल होण्याची शक्यता आहे.
निवड यादीत नाव असलेल्यापैकी काहीजण निरक्षर आहेत. निरक्षरांना सफाई कामगार होता येते, मग मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्यांना सफाई कामगार होता येत नाही का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आहे. बेळगाव महापालिकेतील शंभर सफाई कामगारांची भरती प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्यानंतर आता मराठी शिक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा चर्चेत आली आहे.
प्रक्रियेत कन्नड माध्यमात शिकलेल्यांसाठी काही जागा राखीव होत्या. अन्य माध्यमांत शिकलेल्यांना सामान्य प्रवर्गात समाविष्ट केले आहे. मराठी माध्यमात शिकल्यामुळे निवड यादीत स्थान दिले नसल्याचा प्रकार झाला असेल, तर रीतसर तक्रार द्यावी, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.