ऑक्सफर्ड विद्यापीठ रतन टाटा यांच्या स्मरणार्थ उभारणार नवीन इमारत
सोमरविले कॉलेजसोबतची ही भागीदारी टाटांच्या मूल्यांना श्रद्धांजली आहे. त्यांच्या नावाने बांधलेली इमारत भारतासाठी महत्त्वाचे संशोधन केंद्र ठरणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारताचे प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ (In memory of Ratan Tata) ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सोमरविले कॉलेज आणि टाटा समूहाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सोमरविले कॉलेज आणि टाटा ग्रुप संयुक्तपणे एक इमारत बांधणार आहेत (Oxford University's Somerville College and the Tata Group will jointly construct a building.) या इमारतीचे नाव 'रतन टाटा बिल्डिंग' असे असणार आहे. (Ratan Tata Building) या इमारतीचे बांधकाम 2025 च्या सुरुवातीला फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नवीन ‘रॅडक्लिफ ऑब्झर्व्हेटरी क्वार्टर’च्या (Radcliffe Observatory Quarter) मध्यभागी सुरू होईल.
याविषयी अधिक माहिती देताना टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, "सोमरविले कॉलेजसोबतची ही भागीदारी टाटांच्या मूल्यांना श्रद्धांजली आहे. त्यांच्या नावाने बांधलेली इमारत भारतासाठी महत्त्वाचे संशोधन केंद्र ठरणार आहे."
मिळालेल्या माहितीनुसार, टाटांच्या नावाने बांधली जाणारी ही इमारत ऑक्सफर्ड इंडिया सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे (OICSD) कायमस्वरूपी ठिकाणही बनेल. हे केंद्र ब्लाव्हॅटनिक स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या समोर स्थित असेल आणि प्रतिष्ठित रॅडक्लिफ ऑब्झर्व्हेटरी क्वार्टरमध्ये विकासासाठी उपलब्ध असलेल्या शेवटच्या भूखंडावर बांधले जाईल. लंडनस्थित वास्तुविशारद 'मॉरिस +' कंपनीने नवीन इमारतीची रचना केली आहे. ही इमारत ७०० चौरस मीटर क्षेत्रात असणार आहे.