Success Story : नोकरी झुगारली दहा-बारा हजारात उभारला व्यवसाय... सोमनाथची वेगळी वाट...

मुलांनी केवळ नोकरीच्या पाठीमागे न धावता छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये वेळ देऊन काम केले तर नक्कीच त्यांना यश मिळू शकते

Success Story : नोकरी झुगारली दहा-बारा हजारात उभारला व्यवसाय... सोमनाथची वेगळी वाट...
Somnath Shankar Khedkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

The Success Somnath Khedkar : मुलांनी केवळ नोकरीच्या पाठीमागे न धावता छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये वेळ देऊन काम केले तर नक्कीच त्यांना यश मिळू शकते. त्यासाठी कष्टाची आणि प्रयत्नांची व वेगळा विचार करण्याची गरज आहे. गावकडून पुण्यात अनेक स्वप्न घेऊन आलेल्या आणि निराशेच्या गर्गेतून आपला उत्तम व्यवसाय उभा करणाऱ्या सोमनाथची ही योशोगाथा अन् वेगळी वाट. 

सोमनाथ शंकर खेडकर (Somnath Khedkar), वय वर्ष 25, मुळगाव वालूर, तालुका सेलू , जिल्हा परभणी (Parbhani) वरून शिक्षणासाठी पुण्यातील (Pune) सांगवीमध्ये आला . घरची परिस्थिती बेताचीच. गावाकडे पत्र्याचे साधे घर, आई-वडील शेतमजूर. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात प्रवेश घेतला. अर्थशास्त्र विषय घेऊन पदवीची परीक्षा पास झाला. केवळ भाकरीचा प्रश्न सहजरीत्या सोडवता यावा या आशेनेच आपण अर्थशास्त्र विषय निवडल्याच सोमनाथ सांगतो. पदवीनंतर नोकरीची शाश्वती नसल्यामुळे आणि एकूणच घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे शहरात आल्या आल्या आपण एखादी छोटेखानी नोकरी मिळवावी,  हा विचार त्याच्या सारखाच डोक्यात घोळत असायचा. शेअरिंग रूम मध्ये राहत असताना मित्रांसारखं दिवसभर रूमवर लोळत राहणं परवडणारे नव्हतं म्हणून नोकरीसाठी शोधाशोध सुरू केली. 

तसाही महाविद्यालयीन वेळेनंतर काय करावे हा मोठा प्रश्न होताच म्हणून मग सुरुवातीला 'डी मार्ट'मध्ये नोकरी पत्करली. दहा तास काम करून फक्त आठ हजार रुपये मिळतात हे लक्षात आल्यावर, एक दोन महिन्यातच नोकरीचा विचार सोडला. दोन चार दिवस रूमवर घालवल्यानंतर अस्वस्थता आणखीनच वाढली. रूमवर मित्र असायचे पण ते त्यांचा वेळ असाच वाया घालवायचे. आपण मात्र काहीतरी काम केले पाहिजे. या विचाराने पुरता पछाडून गेलेल्या सोमनाथचं लक्ष एक दिवस महाविद्यालयातून रूमवर येताना रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका भाजी विक्रेत्याने वेधून घेतलं. त्याच्या अवतीभवती भाजी घेणाऱ्या बऱ्याच लोकांचा गराडा त्यांन बघितला. 

हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोण? १९ डिसेंबरला मुलाखती; अंतिम पाच ठरले 

थोडीशी गर्दी हटल्यानंतर तो त्याच्यापाशी गेला, भाजीविक्रेता समवयीन असल्यामुळे त्याला स्वतःची सर्व खरी परिस्थिती सांगितली.आपण फार गोंधळात आहोत, अल्प पगारात नोकरी करून एवढा वेळ वायाला घालवणं आपल्याला शक्य नाही, अस सगळं खरं खरं सांगितलं. त्यानंतर त्याच्याकडून भाजी विक्री संदर्भात योग्य ती खरेदी विक्रीची माहिती मिळवली, मार्गदर्शन मिळवले, स्वतःची परिस्थिती बेताचीच असल्याचं त्यानं त्याला सुरुवातीलाच सांगितलं असल्यामुळे सोमनाथची परिस्थिती ऐकून पहिल्याच भेटीमध्ये त्याचे आणि भाजी विक्रेत्याची मैत्री झाली. तू देखील हा व्यवसाय करू शकतोस.हा विश्वास त्याने त्याला दिला. 

पैशांची जुळवाजुळव...

त्यानंतर पैशांची जुळवाजुळव सुरू झाली.  महाविद्यालयातील कमा-शिकवा योजनेतील आर्थिक मदतीचा देखील यामध्ये हातभार लागला. मित्रांची केलेली तीन हजारांची मदत, नोकरीतून वाचलेले पैसे, कमवा-शिकवातून मिळालेले मानधन आदीच्या जोरावर सोमनाथनं पैशांची जुळवाजुळव करून पुढील दोन दिवसांमध्ये व्यवसायाच्या दृष्टीने लागणारी हातगाडी, तराजू आदींची जुळवाजुळव करून त्या भेटलेल्या भाजी विक्रेत्याच्या मदतीने गुलटेकडी भाजी मार्केट गाठलं. विकण्यासाठी भाजीपाला आणला आणि सांगवीतील फूटपाथवर स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केला. हातगाडीसाठी साधारणत: पाच हजार रुपये ,तराजूसाठी दोन हजार रुपये आणि भाजी आणण्यासाठी पाच हजार रुपये ,अशी जुळवाजुळ करून साधारणतः दहा-बारा हजार रुपयांच्या भांडवलावरती मी हा व्यवसाय सुरू केल्याचं सोमनाथ सांगतो.

शाबासकीची थाप...

दरम्यान ,महाविद्यालयात शिकत असताना अनेक मित्र-मैत्रिणींच्या आणि त्यांच्या पालकांच्या ओळखी झालेल्याच होत्या. त्यामुळे भाजी मंडईत बराच वेळा ही सर्व लोक आपल्या ठेल्यावर येऊन भाजी घेत असत, एवढेच नाही महाविद्यालयातील काही प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य देखील त्याच्या दुकानावरती जाऊन भाजी घेत असल्यामुळे अल्पावधीतच त्याचा व्यवसाय जोर धरू लागला. आपण निवडलेल्या वेगळ्या वाटेचे प्राचार्यांनी कौतुक केले. पाठीवर शाबासकीची थाप दिली.  त्यामुळे आपल्याला आणखीन प्रेरणा मिळाल्याचं सोमनाथ सांगतो. सोमनाथचे प्रयत्न, मित्रांची मदत आणि जमवलेली थोडीशी पुंजी या सगळ्याच्या जोरावर त्याने मानाचा निश्चय  करून व्यवसायाचा प्रवास सुरू केला. 

व्यवसाय अन् संघर्ष...

टोमॅटो,वांगी,भेंडी, बटाटा, कांदा, गवार, लसूण, वॉल, ढोबळी, फ्लावर, आद्रक,मेथी,पालक,शेपू, चवळयी अशा पंधरा-विस प्रकारच्या भाज्या सोमनाथच्या स्टॉलवर असतात. सुरुवातीला कृष्णा चौकातील पदपथावर भाजीची हातगाडी लावत असायचा, तेव्हा दिवसभरात तीन एक  हजार रुपयाचा  धंदा होउन दिवसाला पाचशे एक रुपये त्याला सुटायचे.  पण पुढे त्यामुळे ट्राफिक जाम व्हायची .लोकांना ये-जा करायला अडचण निर्माण व्हायची.पालिकेची लोक येऊन पदपथावर विक्री करण्यास अडकाठी करू लागली .त्यामुळे भाजी विक्रीचा व्यवसाय पदपथाला पर्याय म्हणून सांगवीच्या गल्लोगल्लीत सुरु झाला .या प्रकारामुळे मात्र धंद्याला फटका बसला.  दररोजचे ग्राहक आणि उत्पन्न देखील घटले. परंतु जिद्द न हारता, व्यवसाय न सोडता पुन्हा नव्याने उभं राहायचं सोमनाथनं ठरवलं. सोमनाथ सारख्या अनेक भाजीवाल्यानां ही समस्या आल्यावर सर्व भाजीवाल्यानी  स्थानिक आमदार यांच्याकडे एका ठिकाणी जागा मिळावी म्हणून मागणी केली. 

हेही वाचा : NCERT BOOK : एनसीईआरटीच्या पुस्तकातून 'इंडिया' नाव वगळणार का ? शिक्षण मंत्रालयाचे स्पष्टीकरण...

त्यानंतर आमदारसाहेबांनी साई चौक येथील मोकळी असलेली एक एकरची जागा तात्पुरत्या स्वरूपात सर्वांसाठी उपलब्ध करून दिली. आज या जागेमध्ये 90 ते 100 च्या आसपास भाजी विक्रेतांचा समूह आहे. ही सर्व लोक एकमेकांच्या सुखदुःखात उभे राहतात. वर्षभरामध्ये फुले,शाहू, आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम मंडईच्या आवारात सोमनाथ आणि त्याचे इतर जेष्ठ सहकारी साजरी करत असतात. खरंतर 2017 मध्ये महाविद्यालयीन जीवनाला सुरुवात केलेल्या सोमनाथनं आज या व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे.

दरम्यान,  शिकत असताना महाविद्यालयीन वार्षिक प्रवेश फी देखील सोमनाथनं आपल्या या व्यवसायातूनच उभारल्याचं सांगितलं. एवढेच कमी की काय गावाकडील पत्र्याच्या घराच्या जागेवर त्यांनं अलीकडेच सिमेंटचे घर देखील उभं केल्याचं सांगितलं .हळूहळू आपण सांगवीत देखील एखादं घर लवकरच घेऊ असा त्याचा विश्वास आहे .कष्ट करण्याची ताकद आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळतं, असं  त्याचं म्हणणं आहे. दररोज सकाळी लवकर उठून पहाटे तीन वाजता गुलटेकडी येथे भाजी मार्केटला स्वतः जाऊन दररोज साधारणता सात ते आठ हजार रुपयाची भाजी तो विकत आणतो. त्याचा दररोजचा सरासरी गल्ला सात ते आठ हजार एवढा असतो .पहिल्या दिवशी आणलेल्या मालामध्येच गुंतवलेल्या पैशाची सोडवणूक होते .दुसऱ्या दिवशी जी विक्री होते त्यातून संपूर्ण नफा शिल्लक राहतो. 

सोमनाथ पहिल्या दिवशी आणलेला माल दुसऱ्या दिवशी कमी किमतीत विकल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या ठेल्यावर ठेवत नाही. ग्राहकांना ताजा माल भेटला पाहिजे . त्यांचं समाधान झालं पाहिजे. हे त्याच्या धंद्याचं गमक आहे .साधारण दिवसागणिक एक ते दीड हजार आणि  रविवारी अन् गुरुवारी त्यापेक्षा दुप्पट  आणि सणांच्या काळामध्ये आणखीनही जास्त अशा प्रकारचा त्याला दैनंदिन फायदा होत असल्याचं त्यानं सांगितलं.असं जरी असलं  तरी भाजीपाला हा नाशवंत असल्यामुळे कधी कधी या व्यवसायात नुकसान देखील सहन करावं लागल्याचं तो सांगतो. आज मी हा व्यवसाय करताना सांगवीमध्ये जरी माझा स्वतःचं घर नसलं तरी लवकरच मी माझं स्वतःचं घर घेईल याचा मला विश्वास वाटतो असं  तो आत्मविश्वासानं सांगतो.

हेही वाचा : पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना प्लॅगारिझम सॉफ्टवेअरचा रिपोर्ट बंधनकारक ; काय आहे नवीन नियम

आमच्या मंडईतील अनेक भाजी विक्रेत्यांनी भाजीच्या जोरावर घर घेतल्याचं सोमनाथ सांगतो. व्यवसाय करताना आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी देखील तो घेतो.  त्यानं आपल्या दोन्ही वेळच्या जेवणासाठी एक घरेलू डबा लावला असल्याचं त्यानं आवर्जून सांगितलं. संकटे येतात पण आपण त्याच्याशी दोन हात केले पाहिजेत. त्याच्यातून तरुन निघालं पाहिजे,  असा विचार घेऊन तो जगतो आणि म्हणूनच  कोविडच्या काळात सुरुवातीला आपला व्यवसाय डबघाईला आल्यानंतर  पंतप्रधान स्वनिधी योजनेतून वीस हजार रुपयांचे  कर्ज मिळवून हतबल न होता, त्याने आपला व्यवसाय पुन्हा उभा केला.

मुलांना सल्ला

मुलांनी केवळ नोकरीच्या पाठीमागे न धावता छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये वेळ देऊन काम केले तर नक्कीच त्यांना यश मिळू शकते,  असा विश्वास सोमनाथ व्यक्त करतो. आज जीवनाच्या लढाईमध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी झालेल्या मुलांनी देखील खचून न जाता आत्महत्या न करता अशाच प्रकारे छोट्या छोट्या व्यवसायांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊन आपल्या पायावर उभे राहण्याचा संदेश सोमनाथ आपल्या स्वतःच्या उदाहरणातून  आपल्याला देतो.
 
(शब्दांकन प्रा.भास्कर घोडके  )