MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनात फूट; पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षार्थींच्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनात अचानक फूट पडली आहे. २ ऑक्टोबर रोजीचे प्रस्तावित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याच्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केल्याने पुण्यात दोन स्वतंत्र ठिकाणी आंदोलन सुरू झाले.

MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनात फूट; पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र आंदोलन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षार्थींच्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनात अचानक फूट पडली आहे. २ ऑक्टोबर रोजीचे प्रस्तावित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याच्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केल्याने पुण्यात दोन स्वतंत्र ठिकाणी आंदोलन सुरू झाले. एक गट लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर तर दुसरा गट नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाजवळ एकत्र आला. यामुळे आंदोलनाची एकसूत्रीता भंग झाली असून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत.

यापूर्वी एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत राज्य सरकारने MPSC नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबत न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्याबाबत कारवाई करण्यात आली आणि त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यात आली. या घडामोडींनंतर शिष्टमंडळाने २ ऑक्टोबरचे सत्याग्रह तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली होती. मात्र दुसऱ्या गटाने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला. मुंबईला गेलेल्या प्रतिनिधींनी सर्व आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, आंदोलनाची मुख्य मागणी MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा हीच आहे. कथित परीक्षा गैरप्रकार आणि ड्रग इन्स्पेक्टर पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबवणे योग्य नाही, असा त्यांचा ठाम मत आहे. “हे आंदोलन विद्यार्थ्यांचे आहे. आम्हाला राजकारण नको. आमच्याशी चर्चा न करता निर्णय घेण्यात आला आणि आम्हाला अंधारात ठेवण्यात आले,” अशी भूमिका या गटाने मांडली.

या मतभेदांमुळे पुण्यातील आंदोलन आता दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. एक गट सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून स्थगिती स्वीकारतोय, तर दुसरा गट पूर्ण न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याच्या तयारीत आहे. परीक्षार्थींच्या एकजुटीला तडा गेल्याने आंदोलनाचा पुढचा मार्ग अनिश्चित झाला आहे. विद्यार्थी समुदायात एकता टिकवणे आता सर्वात मोठे आव्हान ठरले आहे.