वाबळेवाडीचे प्रसिध्द साहित्यिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार; ५८ पुस्तके प्रकाशित

साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांची आजपर्यंत ५८ पुस्तके प्रकाशित आहेत. मुळ पिंपळे जगताप (ता. शिरूर) गावच्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

वाबळेवाडीचे प्रसिध्द साहित्यिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार; ५८ पुस्तके प्रकाशित

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वाबळेवाडी शाळेतील (Wablewadi School)उपक्रमशील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर (Teacher Sachin Bendbhar)यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार (State Teacher Award)जाहीर झाला असून वाबळेवाडी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांची आजपर्यंत ५८ पुस्तके प्रकाशित आहेत. मुळ पिंपळे जगताप (ता. शिरूर) गावच्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती  व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दखल घेत त्यांच्या कळो निसर्ग मानवा या कवितेची निवड सहावीच्या सुगमभारती पुस्तकात केली आहे. तसेच मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहाचा या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी (एम.ए.) द्वितीय वर्षीच्या अभ्यासक्रमात पुढील पाच वर्षांसाठी समावेश करण्यात आला आहे.

स्वतः लिहीत असताना त्यांनी  विद्यार्थी व शिक्षकांना लिहिते केले. मनातल्या कविता, शिंपल्यातले मोती आणि परीसस्पर्श अशी विद्यार्थ्यांची तीन पुस्तके संपादित  करीत त्यांनी शाळेत अनेक बालकवी घडवले आहेत. सध्या ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित समग्र शिक्षा अंतर्गत पुस्तक निर्मिती कार्यशाळेत जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षकांना पुस्तक निर्मितीसाठी मार्गदर्शन करत असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळेत बालसाहित्यिक घडविण्याचे त्यांचे ध्येय आहे. 

शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडीचे निर्माते दत्तात्रय वारे यांच्या हस्ते बेंडभर यांचा शाल, श्रीफळ आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सतिश वाबळे, प्रकाश वाबळे, सतिश कोठावळे, पोपट दरंदले, तुषार सिनलकर, हेमराज वारे आदी  उपस्थित होते.
बेंडभर यांच्या या घवघवीत यशाबद्दल मुख्याध्यापक विजय गोडसे, सणसवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर व बाळकृष्ण कळमकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.