स्कूल बस जळून खाक; असुरक्षित विद्यार्थी वाहतुक जीवघेणी : संघटना आक्रमक
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) वेळोवेळी स्कूल बसच्या सुरक्षिततेबाबत नियमावली प्रसिध्द केली आहे. तरी देखील अशा घटना घटल्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे शहरातील खराडी परिसरात १५ ते २० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला (Pune Fire News) अचानक आग (Pune School Bus Fire ) लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) वेळोवेळी स्कूल बसच्या सुरक्षिततेबाबत नियमावली प्रसिध्द केली आहे. तरी देखील अशा घटना घटल्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. त्यामुळे स्कूल बसच्या सुरक्षेबाबत स्कूल बस चालक व शाळा प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे.
खराडी येथील फिनिक्स वर्ल्ड शाळेची बस दुपारच्या सुमारास महावितरण कार्यालयाच्या परिसरातून निघाली होती. या बसमधून १५-२० विद्यार्थी प्रवास करीत होते. रस्त्यात बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. ही बाब लक्षात येताच चालकाने बसमधील विद्यार्थ्यांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. बस चालकाने प्रसंगावधान राखले नसते, तर मोठा अनर्थ घडला असता.
________________________________
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बस या चांगल्या स्थितीत असणे आवश्यकच आहे. शाळा प्रशासनाकडून याबाबत नेहमीच काळजी घेतली जाते. परंतु, काही स्कूल बस या कंत्राटी पद्धतीने खासगी चालकांकडून शाळांसाठी चालवल्या जातात. त्यामुळे पालकांनी सुद्धा जागृक राहिले पाहिजे. पालकांना एखादी समिती स्थापन करून दरमहिन्याला स्कूल बसची तपासणी करता येईल.
- जागृती धर्माधिकारी, अध्यक्ष, आईसा
---------------------------
खराडी, तुळजाभवानी नगर येथे एका स्कुल बसला आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. स्कूल बस जाळून खाक झाली. सुदैवाने सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत. पण स्कूल बस बाबत RTO चे एवढे नियम असताना, अशा घटना कशा घडू शकतात. त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी शहरातील सर्व स्कूल बसची RTO कार्यालयाने तपासणी मोहीम हाती घ्यावी.
- कल्पेश यादव (युवासेना-सहसचिव )
________________________________
'आरटीओ' ने शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व स्कूल बसची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच आरटीओ कार्यालयाने दिलेले फिटनेस सर्टिफिकट पाहिल्याशिवाय संबंधित स्कूल बस शाळांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी देऊ नये. विद्यार्थी सुरक्षा महत्वाची असून बस जाळून खाक होत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे पालक, शाळा, प्रशासन आणि वाहतूक समितीने याबाबत जागृक असायला हवे.
- दिलीप सिंग विश्वकर्मा, महापेरेंट्स