नवीन महाविद्यालय मंजूरीची प्रक्रिया आता विधानसभा निवडणूकीनंतर ?
शासनाकडून सर्व प्रस्तावांची छाननी करून शैक्षणिक संस्थांना नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाते. परंतु, 30 सप्टेंबर पूर्वी याबाबतची कोणतीही प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य शासनाकडून दरवर्षी 30 सप्टेंबरपर्यंत नवीन महाविद्यालयाचे प्रस्ताव (Proposals for a new college)स्वीकारले जातात. मात्र, यंदा राज्य शासनाकडून नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव स्वीकारण्यासंदर्भातील जाहिरातच प्रसिद्ध झाली नाही.त्यामुळे यावर्षी विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections)झाल्यानंतरच नवीन महाविद्यालयांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. परिणामी नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे इच्छा असणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांना (Director of Educational Institutions)आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
राज्य शासनाने व विद्यापीठाने निश्चित केलेल्या बिंदूंप्रमाणे नवीन महाविद्यालयांना त्या त्या भागात मान्यता दिली जाते. त्यासाठीचे प्रस्ताव 30 सप्टेंबर पूर्वी स्वीकारून शासनाकडे सादर केले जातात. शासनाकडून सर्व प्रस्तावांची छाननी करून शैक्षणिक संस्थांना नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाते. परंतु, 30 सप्टेंबर पूर्वी याबाबतची कोणतीही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार शासनाने 30 सप्टेंबर पूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, आता राज्य शासनाला या संदर्भातील अधिसूचना (ऑर्डिनन्स) प्रसिद्ध करावा लागणार आहे. त्यानंतर शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मुदतीत शैक्षणिक संस्थांना प्रस्ताव सादर करावे लागतील.
विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता पुढील आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसात या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन महाविद्यालयाचे प्रस्ताव स्वीकारण्याचे प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता नसल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.परिणामी नवीन महाविद्यालय सुरू होण्यासाठी पुढील वर्ष उजाडणार आहे. मात्र, इच्छुक शिक्षण संस्था चालकांनी त्या दृष्टीने तयारही करून ठेवावी, असेही शिक्षण विभागाचे अधिकारी सांगत आहेत.