मनीष सिसोदिया यांना आता 'ईडी'ची कोठडी

ईडीने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सिसोदिया यांच्या चौकशीसाठी १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना १७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे.

मनीष सिसोदिया यांना आता 'ईडी'ची कोठडी

Manish sisodiya: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी‌ वाढल्या असून सीबीआयनंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांची चौकशी सुरू केली आहे.

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सीबीआयच्या अटकेविरोधात सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आता २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे. त्यातच ईडीने देखील या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

ईडीने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सिसोदिया यांच्या चौकशीसाठी १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना १७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे.

मद्य धोरणाचा निर्णय हा मंत्रिगटाचा असला तरी एका व्यक्तीशिवाय इतर कोणालाही याची माहिती नव्हती ,असा‌ युक्तिवाद ईडीने केला आहे.न्यायालयात युक्तिवाद सादर करताना ईडीने सांगितले, विजय नायर हे संपूर्ण सिंडिकेटचे नेतृत्व करत होते. विजय नायर यांनाच के. कविता भेटली होती. या संदर्भात ईडीने के. कविता आणि विजय नायर यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट सादर केला आहे.

न्यायालयात ईडीची बाजू वकील जोहेब हुसेन यांनी मांडली. मद्य धोरण तयार करण्यामागे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी आपल्या युक्तीवादात केला. धोरणाचे नियम बदलून काही विशेष लोकांना ६ टक्के ऐवजी 12 टक्के लाभ देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. सिसोदिया यांनी संबंधित पुरावेही नष्ट केले असा दावा देखील त्यांनी केला आहे.वृत्त एजन्सीच्या रिपोर्टनुसार मद्य धोरण प्रकरणात आणखी ७ जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.