एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; अध्यक्षांचे काय?
राज्याचे सहसचिव प्रशांत बडगिरी यांच्या स्वाक्षरीने शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून महेंद्र हरपाळकर यांच्या पदाचा कार्यभार आयोगाचे अध्यक्ष यांच्या संमतीने अन्य अधिकाऱ्याकडे तात्काळ सोपवावा,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी नंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थी संघटनांकडून एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा मागितला जात असून सचिव महेंद्र हरपाळकर यांना सुद्धा एमपीएससीतून दूर करावे,अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने शासन आदेश प्रसिद्ध करून हरपाळकर यांचा आयोगातील कार्यभार संपुष्टात आणला आहे.
पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एस एम जोशी फुलावर हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमानवार यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी आयोगाच्या सचिवांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. संभाजी ब्रिगेड तर्फे आयोगाच्या सचिवांना काळे फासण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा संताप विचारात घेता आयोगाने हरपाळकर यांचा कार्यभार संपुष्टात आणला आहे.
राज्याचे सहसचिव प्रशांत बडगिरी यांच्या स्वाक्षरीने शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून महेंद्र हरपाळकर यांच्या पदाचा कार्यभार आयोगाचे अध्यक्ष यांच्या संमतीने अन्य अधिकाऱ्याकडे तात्काळ सोपवावा,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले असून आता अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.