शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा मूलस्रोत म्हणजे परस्परांची संस्कृती समजून घेणे : डॉ.शां.ब.मुजुमदार 

शिक्षणासाठी वेगवेगळ्या देशात जाणारा विद्यार्थी हा संस्कृती व मूल्य घेऊन जात असतो. एकमेकांची संस्कृती व मूल्ये समजून घेणे हाच शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा मूलस्रोत आहे. कोणीही परदेशी विद्यार्थ्यांकडे केवळ ग्राहक म्हणून पाहू नये, कारण पुन्हा आपल्या देशात परतल्यानंतर ते अप्रत्यक्षपणे शिक्षण घेतलेल्या देशाचे ॲम्बॅसिडर म्हणून काम करतात.

शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा मूलस्रोत म्हणजे परस्परांची संस्कृती समजून घेणे  : डॉ.शां.ब.मुजुमदार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (National Education Policy)'इंटरनॅशनलायजेशन ऑफ हायर एज्युकेशन (Internationalization of Higher Education)डायलॉग'ला प्राधान्य देण्यात आले असून विद्यार्थी, शिक्षक,स्कॉलर,विचारवंत यांना परदेशात पाठवणे तसेच परदेशी शैक्षणिक संस्थांशी करार करणे हा शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचाच एक भाग आहे. त्यातच शिक्षणासाठी वेगवेगळ्या देशात जाणारा विद्यार्थी हा संस्कृती व मूल्य घेऊन जात असतो. एकमेकांची संस्कृती व मूल्ये समजून घेणे हाच शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा मूलस्रोत आहे. कोणीही परदेशी विद्यार्थ्यांकडे केवळ ग्राहक म्हणून पाहू नये, कारण पुन्हा आपल्या देशात परतल्यानंतर ते अप्रत्यक्षपणे शिक्षण घेतलेल्या देशाचे ॲम्बॅसिडर म्हणून काम करतात, हे लक्षात घ्यावे, असे प्रतिपादन सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार (Founder President of Symbiosis Dr.S.B.Mujumdar)यांनी शनिवारी केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या वतीने आणि SYU ऑनलाइन डिजिटल एज्युकेशन फाउंडेशन अँड ग्लोबल व्हिजनच्या सहकार्याने आयोजित 'इंटरनॅशनलायजेशन ऑफ हायर एज्युकेशन डायलॉग अँड ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024' च्या (Internationalization of Higher Education Dialogue and Global Education Fair 2024)उद्घाटन  प्रसंगी डॉ. मुजुमदार बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी,प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर, राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, माजी कुलगुरू व एनईपी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, विद्यापीठच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ.विजय खरे, विद्यापीठाच्या इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.देविदास गोल्हार तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू आदी उपस्थित होते. पुण्यासह, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील व इतरही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024 ला हजेरी लावली.SYU ऑनलाइन डिजिटल एज्युकेशन फाउंडेशन अँड ग्लोबल व्हिजनचे संदीप सिंग यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने NIRF व  QS रॅकिंग मध्ये चांगली कामगिरी केली असून 'इंटरनॅशनलायजेशन ऑफ हायर एज्युकेशन'च्या दृष्टीने विद्यापीठातर्फे वेगवेगळ्या देशात उपकेंद्र सुरू केली जात आहेत. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये पुढील काळात वाढ होईल.

डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांनी राज्यातील शैक्षणिक संस्थांचा आढावा घेतला. तसेच नॅक मूल्यांकनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे नमूद केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत 'इंटरनॅशनलायजेशन ऑफ हायर एज्युकेशन'ला तिसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे या घटकांवर चर्चा होणे गराजेचे आहे,असेही देवळाणकर यांनी सांगितले.

डॉ. भूषण पटवर्धन यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषाचा संदर्भ दिला. तसेच डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी इंटरनॅशनलायजेशन ऑफ हायर एज्युकेशनबाबत महत्वाचे योगदान दिल्याचे अधोरेखित केले. तसेच विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व सध्याचे डॉ. सुरेश गोसावी यांनी परदेशात उपकेंद्र सुरू करण्यासाठी केले प्रयत्न कौतुकास्पद आसल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. विजय खरे यांनी ग्लोबल एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाच छताखाली विविध देशातील विद्यापीठांच्या प्रवेशाची माहिती उपलब्ध झाल्याचे सांगितले. तसेच त्यांनी विद्यापीठातर्फे करण्यात आलेल्या विविध आंतरराष्ट्रीय कराराची माहिती दिली.

दरम्यान, ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024ला हजारो विद्यार्थ्यांनी भेट दिली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.विद्यार्थ्यांना यावेळी विविध शिष्यवृत्ती व परकीय भाषांची माहिती मिळाली.उद्घाटन सत्रानंतर उपस्थित मान्यवारांनी 'इंटरनॅशनलायजेशन ऑफ हायर एज्युकेशन' या विषयावर सखोल चर्चा केली.