तंत्र शिक्षण विभागाकडून बेकायदेशीर प्रवेश रद्द; पीआयसीटीला मोठा दणका
तंत्र शिक्षण विभागाने परिपत्रक प्रसिद्ध करून पीआयसीटीने राबवलेले नियमबाह्य प्रवेश रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या संदर्भातील खुलासात कार्यालयास सादर करण्याबाबत कळविले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी (Pune Institute of Computer Technology) या संस्थेने नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबविल्याची तक्रार राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडे (State Common Entrance Test Cell) करण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे नियम धाब्यावर बसून संस्था स्तरावर राबविण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया रद्द (Illegal admission canceled)करण्याचे आदेश पुणे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक डी. व्ही.जाधव (Pune Divisional Technical Education Joint Director D. V. Jadhav)यांनी दिले आहेत.
युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे पीआयसीटीने राबविलेल्या नियमबाह्य प्रवेश प्रक्रिये बाबत लेखी तक्रार केले होती. त्यावर सीईटी सेलने तंत्रशिक्षण विभागाला यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कल्पेश यादव यांनी पुणे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे कार्यवाही करण्यासंदर्भातील निवेदन दिले होते. त्यावर जाधव यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून पीआयसीटीने राबवलेले नियमबाह्य प्रवेश रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या संदर्भातील खुलासात कार्यालयास सादर करण्याबाबत कळविले आहे.
सीईटी सेलच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नियमित प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्याशिवाय संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबविता येत नाही. परंतु, पीआयसीटीने 9 ऑगस्ट रोजी संस्था स्तरावरील प्रवेशाची माहिती प्रसिद्ध करून या जागांच्या प्रवेशाबाबत वेळातपत्रक प्रसिद्ध केले. तसेच अंतिम गुणवत्ता यादीचा दिनांक 31 ऑगस्ट असा ठरविला. त्याचप्रमाणे 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत संस्था स्तरीय प्रवेश निश्चिती करण्याबाबत सुचित केले.त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया रद्द करावी, असे तंत्र शिक्षण विभागाने पीआयसीटीला लेखी पत्राद्वारे कळविले आहे.