हारून आतार यांची पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदी नियुक्ती
हारून आतार यांनी शिक्षण उपसंचालक वंदना वाहूळ यांच्याकडून तात्काळ शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार स्वीकारावा. तसेच याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करावा, अशा सूचना शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील (Deputy Director Of Education, Pune) कामाची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यासाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षण उपसंचालक हारून आतार (Harun Atar, Deputy Director of Education)यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. हारून आतार यांनी शिक्षण उपसंचालक वंदना वाहूळ (Deputy Director of Education Vandana Wahul)यांच्याकडून तात्काळ शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार स्वीकारावा. तसेच याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करावा, अशा सूचना शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
शिक्षण विभागाच्या शैक्षणिक कार्यालयात गेल्या काही वर्षात कमालीचा गोंधळ असल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र परीक्षा परिषदेमध्ये उघड झालेल्या टीईटी घोटाळ्यानंतर येथील आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारण्यास कोणी तयार नव्हते. मात्र,हारून आतार यांच्याकडे आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.परीक्षा परिषदेचे कामकाज सुरळीत झाल्यानंतर त्यांनी काही महिन्यांने आयुक्त कार्यालयात काम केले. त्यानंतर पुणे विभागात निर्माण झालेला शालार्थ आयडीचा गोंधळ सुरळीत करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.आता पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील फाईलींचा डोंगर कमी करून या कार्यालयाचे कामकाज रुळावर आणण्याची मोठी जबाबदारी हारून आतार यांच्याकडे सूपूर्द केली आहे.त्यामुळे 'जिथे कमी तिथे आम्ही' अशी स्थिती हारून आतार यांच्याबाबत झाली आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्या पदोन्नतीनंतर उपसंचालक पद रिक्त झाले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातील शिक्षण उपसंचालक वंदना वाहुळ यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. परंतु, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी प्रशासकीय कारणास्तव वाहुळ यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आणला जात असून तो हारून आतार यांच्याकडे हा कार्यभार सूपूर्द केला जात आहे, असे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.