...अन् वय विसरून त्या साऱ्याजणी ४० वर्षांनी पुन्हा बागडल्या!
सर्व माजी विद्यार्थिनींनी त्यांच्यावेळी त्यांना शिकवायला असणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वेळच्या गुरुजनांनाही आमंत्रित केले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
रांगोळीचा सडा, सनईचे सूर, नटून थटून आलेल्या महिलांची धावपळ, त्यांचे भारावलेपण असे मंगलमय वातावरण नुकतेच पुण्यातील (Pune) अहिल्यादेवी प्रशालेत (Ahilyadevi School) अनुभवायला मिळाले. निमित्त होते, १८८२ सालच्या माजी विद्यार्थिनींच्या (Students) मेळाव्याचे. यावेळी सर्व माजी विद्यार्थिनींनी जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचा काळ पुन्हा एकदा अनुभवला. सर्वजणी क्षणभर आपले वय विसरून शाळेच्या परिसरामध्ये आनंदाने बागडत होत्या.
अहिल्यादेवी प्रशालेमध्ये पुन्हा ४० वर्षांनी ही शाळा भरली होती. सर्व माजी विद्यार्थिनींनी त्यांच्यावेळी त्यांना शिकवायला असणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वेळच्या गुरुजनांनाही आमंत्रित केले होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनघा डांगे ही आपली बालपणीची मैत्रीण विद्यमान मुख्याध्यापिका आहे, याचा या मैत्रिणींना आनंद झाला होता. त्यावेळच्या मुख्याध्यापिका जयश्री वैद्य याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
हेही वाचा : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट
मुख्याध्यापिका अनघा डांगे यांनी आपल्या मैत्रिणींना अहिल्यादेवी शाळेतील विद्यार्थिनी ते शाळेचे मुख्याध्यापिका होण्याचा प्रवास उलगडून दाखवला. डांगे आपल्या भाषणात म्हणाल्या की, शाळेची शिस्त, विविध स्पर्धा या पूर्वीसारख्याच आहेत. त्यात थोडाही बदल झालेला नाही. मुख्याध्यापक म्हणून जेव्हा मी शाळेत वावरते तेव्हा जागोजागी मला आपल्या वेळेसचे शिक्षक भेटतात आणि ते मला माझ्या या वळणावर मार्गदर्शन करतात. एक विद्यार्थिनी ते मुख्याध्यापिका हा प्रवास माझ्यासाठी खरोखर अभिमानाचा क्षण आहे.
शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/
कार्यक्रमाची सुरुवात मानसी देशपांडे व माजी विद्यार्थिनी किशोरी कुलकर्णी यांनी गायलेल्या ईशस्तवनाने झाली. प्रास्ताविक वीणा नगरकर यांनी तर सूत्रसंचालन यशश्री पुणेकर यांनी केले. उज्ज्वल लघाटे यांनी शाळा आणि शिक्षकां प्रती कृतज्ञता व्यक्त केली. शुभदा गोडबोले यांनी आभार मानले. किशोरी कुलकर्णी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.