डॉ.अविनाश आवलगावकर मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
मराठीतून रोजगारक्षम अभ्यासक्रमांची निर्मिती व्हावी, या दृष्टीने नवे अभ्यासक्रम विद्यापीठाद्वारे तयार केले जाणार आहेत.
एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. अविनाश आवलगावकर (Avinash Avalgaonkar)यांची अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन केलेल्या मराठी भाषा विद्यापीठाचे(Marathi Language University) पहिले कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.आवलगावकर हे संत साहित्याचे अभ्यासक असून त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.
विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात डॉ.आवलगावकर यांचाही समावेश होता.तसेच आवलगावकर हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील राजुराबाजार पासून दोन किलोमीटरवर असलेल्या काठी या छोट्याशा गावचे आहेत.डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठी भाषा विद्यापीठात नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत अहवाल सादर केला होता.आता कुलगुरूंची नियुक्ती झाल्याने विद्यापीठाच्या कामाला गती येईल,अशी अपेक्षा आहे.
अवलगावकर यांची नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा कुलपतींद्वारे पूर्णवेळ कुलगुरूंची नियमित नियुक्ती होईपर्यंत जे आधी होईल तोपर्यंत डॉ. आवलगावकर यांच्याकडे पदभार रहाणार आहे. तसेच विद्यापीठाचे पहिले कुलसचिव म्हणून उच्च शिक्षण विभागाच्या अमरावती विभागाचे सहसंचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या विद्यापीठाचे स्वरूप हे 'एकल विद्यापीठा'च्या धर्तीचे असणार आहे. शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय प्रवाहांना अनुसरणारे आंतरज्ञानशाखीय व बहुकौशल्य प्राप्त मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा नव्या अभ्यासशाखा या विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहेत. वर्तमान आणि भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन मराठीतून रोजगारक्षम अभ्यासक्रमांची निर्मिती व्हावी, या दृष्टीने नवे अभ्यासक्रम विद्यापीठाद्वारे तयार केले जाणार आहेत.
भारतात आणि जागतिक पातळीवर मराठी भाषा व संस्कृतीच्या प्रसार व संवर्धनासाठी कार्य करणारी प्रगत शैक्षणिक व संशोधन संस्था म्हणून 'मराठी भाषा विद्यापीठ' आपली भूमिका पार पाडणार आहे. त्यासाठी भाषांतरविद्या व तौलनिक साहित्याभ्यास विद्याशाखा स्थापन करण्यात येणार असून या विद्याशाखेतून गुजराती, कन्नड, तेलुगू, मल्याळम, बंगाली इत्यादी भारतीय भाषांचे आणि 'विश्वभारती'या विभागामार्फत इंग्रजी, फ्रेंच, जपानी, रशियन, चीनी, कोरियन, अरबी-फारसी इत्यादी विदेशी भाषांचे अध्ययन, द्वैभाषिक भाषांतर व संशोधन प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. विदेशातील विद्यापीठे व शैक्षणिक-सांस्कृतिक संस्थांबरोबर सामंजस्य करार करून मराठी भाषा व संस्कृतीचे महाजाल प्रस्थापित करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय भाषाकेंद्रही स्थापन करण्यात येणार आहे. मराठीच्या विकासासाठी दृकश्राव्य व संगणीकीय शैक्षणिक साधनांची निर्मिती करून विद्यापीठातर्फे ऑनलाइन शिक्षणक्रम सुरू करण्याचीही योजना आहे.