MPSC: गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर; अवधूत दरेकर राज्यात पहिला
परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत अनिल दरेकर याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून मुलींमध्ये सातारा जिल्ह्यातील सोनाली रमेश भिसे हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे (MPSC)5 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 (Non-Gazetted Group B Services Main Exam 2023) या परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी (ASO)या संवर्गाच्या एकूण 164 पदांचा अंतिम निकाल जाहीर (Final result announced)करण्यात आला आहे. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत अनिल दरेकर (Avadhoot Anil Darekar)याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून मुलींमध्ये सातारा जिल्ह्यातील सोनाली रमेश भिसे (Sonali Ramesh Bhise)हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातून यवतमाळ जिल्ह्यातील गजानन सिताराम राठोड (Gajanan Sitaram Rathod)याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आयोगातर्फे न्यायालयाचे आदेश तसेच संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या आधीन राहून हा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गातील शिफारस पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कट ऑफ मार्क्स) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. खेळाडू व इतर वर्गवारी मध्ये शिफारस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना निकालामध्ये तात्पुरत्यारित्या समाविष्ट करण्यात आलेले आहे. या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी शासनाकडून करण्याच्या आधीन राहून ही शिफारस केली गेली आहे.
MPSC : गट-ब, व गट-क सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध; महत्त्वाचे बदल..
या परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्द्यांसंदर्भात तसेच अन्य मुद्द्यांसंदर्भात विविध न्यायालयात किंवा न्यायाधीकरणात दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर केला गेला आहे. त्याचप्रमाणे अंतिम निकालात शिफारस पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तर पत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठवण्याच्या दिनांकापासून दहा दिवसात आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.