भारतीय शिक्षकांकडे विश्व समजून घेण्याचा प्राचीन वारसा : विनय सहस्रबुद्धे

केवळ शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण नाही तर जागतीकरणाचे आंतरराष्ट्रीयीकरण होणे गरजेचे आहे.बदलत्या स्थितीमध्ये भारताला अनेक संधी आहेत.

भारतीय शिक्षकांकडे विश्व समजून घेण्याचा प्राचीन वारसा : विनय सहस्रबुद्धे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

" भारतीय प्राचीन साहित्यात वसुधैव कुटुंबकम हे वैश्विक वारसामूल्य आहे.जगाचे वैश्विकीकरण हेच खऱ्या अर्थाने शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण होय.विकसित अथवा अतिविकसित देशात कुटुंबव्यवस्था आणि जगण्यातील अतिव्यक्तीकरण यामुळे संवेदनशीलता लोप पावली आहे.अशावेळी भारतातील समाजव्यवस्थेत असलेली प्राचीन मूल्यव्यवस्था, वसुधैव कुटुंबकम ही भावना ह्या सर्व मौलिक संपदेचे वैश्विकीकरण होण्याची गरज आहे.अशा  वैश्विकीकरणातून होणारे शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण ही काळाची गरज आहे" असे प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) चे माजी अध्यक्ष डॉ.विनय सहस्रबुद्धे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या वतीने आणि SYU ऑनलाइन डिजिटल एज्युकेशन फाउंडेशन अँड ग्लोबल व्हिजनच्या सहकार्याने आयोजित 'इंटरनॅशनलायजेशन ऑफ हायर एज्युकेशन डायलॉग अँड ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024 चे आयोजन करण्यात आले.त्यातील ' शिक्षणाच्या आंतराराष्ट्रीयीकरणाच्या संधी आणि आव्हाने'  या विषयांवरील दुसऱ्या सत्रात डॉ.विनय सहस्रबुद्धे बोलत होते.या सत्राचे अध्यक्षपद एनईपी सुकाणू समितीचे अध्यक्ष व माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी भूषवले.या सत्रात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी,प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर, आंतरराष्ट्रीय केंद्राच्या संचालक डॉ. विजय खरे, राज्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी सहभाग घेतला.

 डॉ.विनय सहस्रबुद्धे म्हणाले, केवळ शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण नाही तर जागतीकरणाचे आंतरराष्ट्रीयीकरण होणे गरजेचे आहे.बदलत्या स्थितीमध्ये भारताला अनेक संधी आहेत.शिक्षक व शिक्षण पध्दती हे महत्वाचे घटक आहेत. केवळ विद्यार्थी- शिक्षक देवाण घेवाण उपयोगाची नाही.संस्कृती, साहित्य, कला यांना प्रोत्साहन द्यालया हवे.तसेच स्थैर्य, शांतता, विकास या दृष्टीने 'जागतिक नागरिक'कसा तयार होईल,या दृष्टीने प्रयत्न करायला हवा.
 
दुसऱ्या सत्रातील विषयावर डॉ.सुरेश गोसावी,डॉ.पराग काळकर, डॉ. विजय खरे, डॉ.विनोद मोहितकर यांनी सविस्तर चर्चा केली.यासत्राचे आभार विद्यापीठाच्या इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.देविदास गोल्हार यांनी मानले. 

दरम्यान, ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024 च्या तिसऱ्या सत्रात जॉर्जियाच्या ॲनानो तशीताईशविली तर तजाकीस्थानचे अबदुगाफर दझहाबोरोव यांच्याश परदेशातील चार विद्यापीठांच्या प्रतिनिधीनी सहभाग घेतला.तसेच विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ.ज्योती भाकरे यांनीही या सत्रात सहभाग घेतला.